SBI दरोड्याचा काही तासांत थरारक शेवट; चारही दरोडेखोर जेरबंद, २७ किलो सोने आणि १२ लाखांच्या वर रोकड हस्तगत!
दुपारी २.४५ वाजता जळगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीत भोकरी येथील स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखेत अचानक चार सशस्त्र दरोडेखोरांचा बँकेत प्रवेश केला आणि देशी कट्ट्यातून जमिनीवर गोळी झाडत बँक कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करण्यात आली. स्टाफ आणि मैनेजर ला त्यांनी बांधले आणि तोंडावर पट्टी देखील लावली .कर्मचाऱ्यांना धमकावून दरोडेखोरांनी तब्बल २७ किलो सोने आणि सुमारे १२ लाख च्या वर रुपयांची रोकड लुटली आणि सहा बॅगा घेऊन दोन मोटारसायकलींवरून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच जळगाव पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता हालचाली सुरू केल्या. संभाव्य पळवाटांवर पोलिसांना सतर्क करण्यात आले. विविध पोलीस पथकांनी समन्वयाने शोधमोहीम सुरू केली आणि सर्वात महत्वाचे नागरिकांना देखील आरोपींच्या मूवमेंट, पेहराव आणि वाहने ( दोन दुचाकी) बाबत तत्काळ अवगत केले गेले
पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्थानिक नागरिकांनी विलक्षण धाडस आणि प्रसंगावधान दाखवले. त्यांच्या मदतीने एका दरोडेखोराला पकडण्यात यश आले.
त्याच्यासोबत असलेला दुसरा आरोपी जवळच्या शेतात पळून गेला. मात्र, रस्त्यावर शोधमोहीम राबवत असलेल्या PSI वलटे यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला १.३० तासानंतर शोधून काढले आणि दीक्षाईगाव परिसरात त्याला जेरबंद केले. त्याच्याकडील दोन बॅगा हस्तगत करण्यात आल्या.
उर्वरित दोन आरोपी मोटारसायकलवरून धारंगावच्या दिशेने पळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. धारंगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी आपल्या पथकासह चावसखेडा बोगद्याजवळ आधीच सतर्कता बाळगून नाकाबंदी केली होती
पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने दोन्ही आरोपींना तिथेच अडवून ताब्यात घेतले. त्यांच्याकडील उर्वरित चार बॅगाही हस्तगत करण्यात आल्या.
अशा प्रकारे काही तासांच्या आत चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आणि दरोडेखोरांनी लुटलेल्या मुद्देमालाच्या सर्व सहा बॅगा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे :
* सुमारे २७ किलो सोने
* सुमारे १२ लाख च्या वर रुपये रोख
* गुन्ह्यात वापरलेले २ देशी कट्टा
* दोन मोटारसायकली
विशेष म्हणजे, या गुन्ह्यातील आरोपींची पार्श्वभूमीही गंभीर आहे. त्यांच्यापैकी काही आरोपींचा यापूर्वीच्या गंभीर गुन्ह्यांशी संबंध असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, यातील तीन आरोपींची ओळख काही वर्षांपूर्वी जळगाव जिल्हा कारागृहात झाली होती. त्यानंतर त्यांनी चौथ्या आरोपीसोबत मिळून या दरोड्याचा कट रचला आहे.
आरोपींची सविस्तर पार्श्वभूमी
अ) शंकर रमेश जसक (वय ४३ वर्षे, शैक्षणिक पात्रता – बी.ए.)
राहणार – जळगाव.
महाराष्ट्र पोलीस दलातील २०१५ च्या ११३ व्या बॅचमधील PSI म्हणून रायगड जिल्हा पोलीस दलात कार्यरत होता.
जळगाव येथील शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल SBI दरोडा प्रकरण (गु.र.नं. ९३/२०२३, कलम ३९४, ३४ भा.दं.वि.) यामध्ये आरोपी असल्याने तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. प्रवीण पवार यांनी २०२३ मध्ये त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ केले होते.
सदर गुन्ह्यात त्याचे वडील तसेच संबंधित बँकेत शिपाई म्हणून कार्यरत असलेला त्याचा मेहुणा यांचाही आरोपी म्हणून समावेश होता.
यापूर्वी महाड, जिल्हा रायगड येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळा कारवाईप्रकरणी महाड पोलीस ठाण्यात गु.र.नं. १६६/२०१८, दि. २७/१२/२०१८ अन्वये गुन्हा दाखल झाल्याने त्याला २०१८ मध्ये निलंबित करण्यात आले होते.
तत्कालीन पोलीस अधीक्षक श्री. अशोक धुडे यांनी जून २०२१ मध्ये त्याचे निलंबन रद्द केले होते. त्यानंतर त्याची रायगड जिल्हा नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली होती.
ब) अंकुश तुळशीराम चव्हाण
राहणार – बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश.
यापूर्वी खालील गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी:
जामनेर पोलीस ठाणे गु.र.नं. ४२४/२०२३, कलम ३९५ भा.दं.वि.
मुक्ताईनगर पोलीस ठाणे गु.र.नं. ३०७/२०२३, कलम ३९९ भा.दं.वि.
भोकरी येथील SBI दरोड्यादरम्यान बँकेच्या आत गोळी झाडल्याचा आरोप आहे.
सदर गुन्ह्यात वापरण्यात आलेला देशी कट्टा पोलिसांनी हस्तगत केला आहे.
क) गजानन राजेंद्र पवार
राहणार – नाशिक ग्रामीण.
चाळीसगाव पोलीस ठाणे गु.र.नं. २६६/२०२४, कलम ३०२ भा.दं.वि. या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी.
आपल्या भावाच्या पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांच्या कारणावरून स्वतःच्या चुलत भावाची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
सदर खुनाच्या गुन्ह्यात त्याची सुमारे दोन महिन्यांपूर्वी जामिनावर सुटका झाली होती.
ड) अंकुश श्रावण चव्हाण
- राहणार – जळगाव.
पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी दाखवलेले धाडस हे पोलीस आणि जनता यांच्या विश्वासाच्या नात्याचे उत्तम उदाहरण आहे. पोलीस एकटेच गुन्हेगारीशी लढत नाहीत, तर जागरूक नागरिकांची साथ मिळाली तर गुन्हेगारांना पळून जाणे अशक्य होते, हे या घटनेने पुन्हा सिद्ध केले आहे.