Monday, 12 October 2026 03:20:53 AM
जळगाव

पाळधीत बसखाली येऊन दहावीतील विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू,सर्वत्र हळहळ तर अजूनही विद्यार्थ्यांची सुरक्षितता ऐरणीवर आहे हा मोठा प्रश्न आहे .

पाळधीत बसखाली येऊन दहावीतील विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू,सर्वत्र हळहळ तर अजूनही विद्यार्थ्यांची सुरक्षितता ऐरणीवर आहे हा मोठा प्रश्न आहे .

जळगाव प्रतींनिधी 

पाळधीत बसखाली येऊन दहावीतील विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू 


शाळा सुटल्यानंतर बस पकडताना घडली हृदयद्रावक घटना; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
जळगाव : पाळधी येथे शाळा सुटल्यानंतर बस पकडण्यासाठी झालेल्या गर्दीत पाय घसरून बसखाली आल्याने दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. राजनंदिनी शिंदे असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून ती पाळधी येथील झंवर विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होती. या घटनेने पाळधी परिसरावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, झंवर विद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थी आपापल्या गावाकडे जाण्यासाठी बस पकडण्यासाठी मोठ्या संख्येने बसस्थानक परिसरात जमा झाले होते. बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी आणि धावपळ सुरू असताना राजनंदिनी शिंदे हिचा अचानक पाय घसरला. ती बसखाली पडल्याने बसचे चाक तिच्या अंगावरून गेल्याची प्राथमिक माहिती आहे.
या भीषण दुर्घटनेनंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या दुर्घटनेत राजनंदिनीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच तिच्या नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
या दुर्घटनेनंतर पाळधी येथे शाळा सुटण्याच्या वेळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शाळा सुटल्यानंतर मोठ्या संख्येने विद्यार्थी बस पकडण्यासाठी गर्दी करतात. उपलब्ध बससेवा अपुरी पडत असल्याने बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये धावपळ होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
शाळा सुटण्याच्या वेळेतील विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त बसफेऱ्या सुरू कराव्यात तसेच विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बससेवेची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
दरम्यान, या घटनेप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत घडला, याचा पोलीस तपास करीत आहेत.
राजनंदिनीच्या अकाली मृत्यूने तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचे सहकारी विद्यार्थी, शिक्षक आणि परिसरातील नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन आणि एसटी महामंडळाकडून ठोस उपाययोजना केव्हा करण्यात येणार, असा सवाल पाळधीकरांकडून उपस्थित केला जात आहे.