मत्स्यव्यवसाय विभागाच्या २३ योजनांसाठी महाडीबीटी २.० वर अर्ज प्रक्रिया सुरू
जळगाव जिल्ह्यातील मत्स्यव्यावसायिकांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव, दि. 03 (जिमाका): मत्स्यव्यवसायिकांचे जीवनमान उंचावणे, आर्थिक समृद्धी साधणे, रोजगार व उद्योजकतेला चालना देणे आणि मत्स्यव्यवसायातून शाश्वत उत्पन्न उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना सुरू केली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या २३ योजनांसाठी महाडीबीटी २.० प्रणालीवर ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.
या योजनांमध्ये भूजलाशयीन मत्स्यव्यवसायासाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ ऑक्टोबर २०२६ रोजी महाडीबीटी २.० प्रणालीवर अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ केला आहे.
तसेच मच्छीमारांना मासेमारी परवाना वितरणाची सेवाही ऑनलाइन करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे ऑफलाइन कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. उपलब्ध शासकीय डेटाबेसमधून माहितीची पडताळणी करण्यात येणार असून, योजनांचे अनुदान लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात ऑनलाइन जमा होणार आहे. तसेच सेवांची प्रमाणपत्रेही ऑनलाइन उपलब्ध होणार आहेत.
जळगाव जिल्ह्यातील सर्व मत्स्यकास्तकार , मच्छीमार, मत्स्यव्यावसायिक व मच्छीमार संस्थांनी https://mahadbt2.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर आधार क्रमांकाद्वारे MahalD तयार करून योजनांसाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज करताना किंवा MahalD तयार करताना अडचण आल्यास सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक), जळगाव कार्यालयाशी संपर्क साधावा. कार्यालयात मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना कक्ष स्थापन करण्यात आला असून, अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत ०२५७-२२२६१३९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले असल्याचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय जळगाव यांनी कळविले आहे.