Friday, 27 November 2026 09:13:59 PM
गुन्हे

भोकर एसबीआय बँक दरोडा प्रकरण; कारागृहातून बडतर्फ पीएसआयने रचला कट, ३६.४८ कोटींच्या मुद्देमालासह चार आरोपी जेरबंद

भोकर एसबीआय बँक दरोडा प्रकरण; कारागृहातून बडतर्फ पीएसआयने रचला कट, ३६.४८ कोटींच्या मुद्देमालासह चार आरोपी जेरबंद

पोलील अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची पत्रकार परिषदेत माहिती

जळगाव, 1 नोव्हेंबर: जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शाखेवर शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. हेल्मेट आणि मास्क घालून आलेल्या चार दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत सुमारे २७ किलो सोने आणि १२ लाख २६ हजार ५०० रुपयांची रोकड लुटली. लुटलेल्या सोन्याची किंमत ३६ कोटी ३६ लाख २३ हजार रुपये असून, रोख रकमेसह एकूण ३६ कोटी ४८ लाख ४९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आहे. 

दरम्यान, पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने नाकाबंदी करत अवघ्या काही तासांत चारही आरोपींना संपूर्ण मुद्देमालासह अटक केली. या दरोड्याचा कट एका बडतर्फ पोलीस उपनिरीक्षकाने कारागृहात असतानाच रचल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आज 1 नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिली.

भोकरच्या एसबीआय बँकेच्या शाखेत दरोड्याची घटना 
भोकर येथील मुख्य रस्त्यालगत असलेल्या SBI बँकेच्या शाखेत ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी २.४५ ते ३.१५ वाजेच्या दरम्यान चार अनोळखी व्यक्तींनी प्रवेश केला. डोक्यावर हेल्मेट आणि चेहऱ्यावर मास्क अथवा रुमाल बांधलेल्या या आरोपींकडे बंदूक, धारदार चाकू आणि लाकडी दांडका होता. त्यांनी शाखा व्यवस्थापक जयेश दगडू राणे, कॅशियर रणजित मराठे यांच्यासह बँकेतील इतर कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत मारहाण केली. 

सुरक्षा रक्षक संदीप कोळी यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी शंकर जासक याने त्यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर आरोपींनी स्ट्राँग रूममधील लॉकरमधून १२ लाख २६ हजार ५०० रुपयांची रोकड आणि तारण ठेवलेले सोन्याचे दागिने ८७१ बॅगमध्ये भरून पोबारा केला.

पोलिसांची अवघ्या काही तासांत कारवाई 
घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. भोकर येथील महिला पोलीस पाटलांचे सासरे संभाजी पवार यांनी दुपारी ३.१७ वाजता पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस पथकाने नियंत्रण कक्षाला सतर्क करत परिसरातील विविध मार्गांवर नाकाबंदी केली. नांद्रा बीटचे पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने संशयितांचा शोध सुरू करण्यात आला. डिकसाई परिसरातील नाकाबंदीदरम्यान अंकुश तुळशीराम पवार (चव्हाण) आणि अंकुश श्रावण चव्हाण या दोघांना लुटलेल्या मुद्देमालाच्या बॅगेसह पकडण्यात आले. त्यांच्या चौकशीतून अन्य दोन आरोपी धरणगावच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळाली. त्यानुसार धरणगाव पोलिसांना सतर्क करण्यात आले. पोलीस निरीक्षक रमाकांत गायकवाड यांच्या पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने नाकाबंदी करून गजानन राजेंद्र पवार आणि शंकर रमेश जासक यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले.

पोलिसांनी अटक केलेले चारही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे. अंकुश तुळशीराम पवार याच्याविरुद्ध मुक्ताईनगर आणि जामनेर पोलीस ठाण्यांत दरोड्याच्या तयारीसह जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. गजानन राजेंद्र पवार याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद आहे. तर शंकर रमेश जसक याच्याविरुद्ध शनीपेठ पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडूनही त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय बडतर्फ पोलीस उपनिरीक्षकाने कारागृहात असतानाच या दरोड्याचा कट आखल्याची बाबही पोलीस तपासातून समोर आली आहे.

मुद्देमालासह चारही आरोपी पोलिसांना अटक 
या प्रकरणी पोलिसांनी अंकुश तुळशीराम पवार (चव्हाण, वय २५, रा. खापरखेडा, ता. खकनार, जि. बुऱ्हाणपूर, मध्य प्रदेश), गजानन राजेंद्र पवार (वय ३२, रा. न्यायडोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक),  शंकर रमेश जासक (वय ४२, रा. मन्यारखेडा, ता. जि. जळगाव, खेडदेवी रोड) आणि अंकुश श्रावण चव्हाण (वय ३०, रा. रामदेववाडी, ता. जि. जळगाव) या चार आरोपींना अटक केली आहे.  जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), १०९ (१), १२७ (२), ११५ (२), ३५१ (२), ३५१ (३), ३५२, ३ (५) तसेच शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ३/२५ आणि ३/२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव तालुका पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा आणि धरणगाव पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत दोन दुचाकींसह संपूर्ण लुटलेला मुद्देमाल (27 किलो सोने व 12 लाखांहून अधिक रोख रक्कम) जप्त करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या