Monday, 12 October 2026 03:22:05 AM
समाज

जळगाव पोलिस दलातर्फे पत्रकारांसाठी ‘विश्वासाची लेन्स’ छायाचित्र स्पर्धेचे आयोजन

जळगाव पोलिस दलातर्फे पत्रकारांसाठी ‘विश्वासाची लेन्स’ छायाचित्र स्पर्धेचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्हा पोलिस दलाच्या वतीने नागरिक, पोलीस आणि समाज यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि सकारात्मक संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने पत्रकारांसाठी ‘विश्वासाची लेन्स : पोलीस–पत्रकार–जनता सहकार्य छायाचित्र स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.

छायाचित्र हे समाजातील वास्तव, भावना, संघर्ष, सेवा आणि कर्तव्याचे प्रभावी दस्तऐवजीकरण करणारे माध्यम आहे. पत्रकार समाजातील महत्त्वाच्या घटनांचे साक्षीदार असून त्यांच्या छायाचित्रांद्वारे समाजापर्यंत सकारात्मक संदेश पोहोचतो. या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

स्पर्धा पोलीस इन पब्लिक सर्व्हिस, ट्रॅफिक, सोशल, जळगाव हेरिटेज, स्पोर्ट्स आणि ह्यूमन एम्पॉवरमेंट अशा विविध गटांमध्ये होणार आहे. स्पर्धकांनी आपली छायाचित्रे १२ ऑगस्ट २०२६ पर्यंत निश्चित व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवायची आहेत.

निवड झालेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन १५ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येणार असून प्रत्येक गटातील प्रथम तीन विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येईल.

जिल्ह्यातील पत्रकारांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या छायाचित्रांमधून समाजातील सकारात्मकता, लोकसहभाग आणि सेवाभावाचे प्रभावी दर्शन घडवावे, असे आवाहन जळगाव जिल्हा पोलिस दलाने केले आहे.

 

संबंधित बातम्या