जळगाव, दि. ६ (प्रतिनिधी) : भक्ती, आनंद आणि पालकांच्या उत्स्फूर्त सहभागाने अनुभूती बाल निकेतन व अनुभूती विद्या निकेतनमध्ये ४ सप्टेंबर रोजी जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवानिमित्त शाळेचा परिसर जणू गोकुळ-वृंदावनातच रूपांतरित झाला होता.
उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते मातांचा उत्स्फूर्त सहभाग. काही चिमूरड्या विद्यार्थ्यांनी कीबोर्ड वादन करून अच्युतम केशवम के भजन गायन करत सगळ्यांची मने जिंकली.
मातांनी नृत्य, नाटिका, भजन तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून संपूर्ण वातावरण कृष्णमय केले. त्यांच्या सादरीकरणातून श्रीकृष्णावरील भक्ती, वात्सल्य आणि मुलांप्रती असलेले प्रेम प्रभावीपणे व्यक्त झाले. मातांचा उत्साह पाहून विद्यार्थ्यांच्याही चेहऱ्यावर आनंद फुलला.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे शाळेच्या वतीने अधोरेखित करण्यात आले. घर आणि शाळेतील सुदृढ नाते मुलांच्या भावनिक, सामाजिक, बौद्धिक तसेच सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरते, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
यावेळी अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन व अंबिका जैन यांनी पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक केले. प्राचार्य मनोज परमार यांनी सर्व माता, पालक, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
पालक आणि शाळेतील प्रेम, विश्वास व सहभागाचे नाते अधिक दृढ करणारा हा जन्माष्टमी उत्सव विद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि संस्मरणीय ठरला.