जळगावच्या पाटील कुटुंबाला गुजरातमध्ये कालव्यात फेकले; चौघांचा मृत्यू, एका मुलाचा शोध सुरू
मंत्री गिरीश महाजन यांनी गुजरात पोलिसांशी साधला संपर्क; विमा प्रकरणातून हत्याकांड झाल्याचा संशय
जळगाव : कामाच्या शोधात गुजरातमधील सुरतकडे निघालेल्या जळगाव जिल्ह्यातील पाटील कुटुंबावर अत्यंत भीषण प्रसंग ओढवला. सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यात या कुटुंबातील सहा जणांना कालव्यात फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत आतापर्यंत चौघांचे मृतदेह आढळले असून, एक १३ वर्षीय मुलगा बचावला आहे. तर एका मुलाचा शोध अद्याप सुरू आहे.
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल परिसरातील नितीन ऊर्फ भुऱ्या पाटील हे पत्नी कविता पाटील आणि चार मुलांसह कामाच्या शोधात गुजरातमधील सुरत येथे जात होते. प्रवासादरम्यान बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ त्यांचे वाहन अडवून कुटुंबातील सदस्यांना कालव्यात फेकल्याचा आरोप आहे.
या घटनेत नितीन पाटील, कविता पाटील आणि त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. त्यानंतर गुरुवारी आणखी एका मुलाचा मृतदेह आढळल्याने मृतांची संख्या चार झाली आहे. १३ वर्षीय मुलगा या घटनेतून बचावला असून, १६ वर्षीय मुलाचा शोध सुरू आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी गुजरात पोलिस प्रशासनाशी फोनवर संपर्क साधून घटनेचा तपशील जाणून घेतला. या हत्याकांडामागे विमा प्रकरणाशी संबंधित कारण असल्याचा संशय गुजरात पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असून, त्या दिशेने तपास सुरू आहे.
दरम्यान, या प्रकरणी जळगाव जिल्ह्यातील एका संशयिताला अटक करण्यात आली असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. गुजरात पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.
जळगावच्या कुटुंबावर गुजरातमध्ये घडलेल्या या अमानुष घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.