भोकर बँक दरोड्याला मोठा ब्रेक! चावलखेड्यात धरणगाव पोलिसांची धडक कारवाई; दोन दरोडेखोर जेरबंद!
रेल्वे बोगद्याजवळ पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी पकडले आरोपी; दोन ते तीन बॅगा जप्त
धरणगाव (जळगाव) : जळगाव तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकून पसार झालेल्या दरोडेखोरांपैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. धरणगाव तालुक्यातील चावलखेडा येथील रेल्वे बोगद्याजवळ धरणगाव पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही धडक कारवाई केली. शंकर जासक आणि गजानन पवार अशी पकडण्यात आलेल्या दोघांची नावे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
भोकर येथील स्टेट बँकेच्या शाखेत चार दरोडेखोर दुचाकीवरून आले होते. त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून बँकेतील रोकड लुटली आणि घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी दरोडेखोरांचा पाठलाग सुरू केला. यावेळी एका आरोपीला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, दरोडेखोर धरणगावच्या दिशेने पसार झाल्याची माहिती मिळताच धरणगावचे पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांनी आपल्या पथकासह तातडीने चावलखेड्याच्या दिशेने धाव घेतली. चावलखेडा येथील रेल्वे बोगद्याजवळ पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणखी दोघांना पकडले.
या कारवाईत पकडलेल्या आरोपींकडून दोन ते तीन बॅगा जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. पिस्तुलाचा धाक दाखवून बँक लुटल्याची प्राथमिक माहिती पोलीस चौकशीत समोर येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही दरोडेखोरांकडून बॅगा जप्त केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिल्याची माहिती आहे.
भरदिवसा बँकेवर सशस्त्र दरोडा आणि त्यानंतर पोलिसांनी केलेल्या वेगवान कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या दरोड्यातील अन्य आरोपींचा शोध आणि लुटलेल्या रकमेबाबत आता पोलीस तपास सुरू आहे.