सोमवार, 24 ऑगस्ट 2026 12:17:48 दुपारी
गुन्हे

भडगाव-चाळीसगाव मार्गावर भीषण अपघात; आयशरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर

भडगाव-चाळीसगाव मार्गावर भीषण अपघात; आयशरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर

जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना वाढत असल्याचं दिसत असून अशातच भडगाव-चाळीसगाव मार्गावरील तांदुळवाडी फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात पाचोरा तालुक्यातील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. धनराज भगवान निकुंभ (रा. घुसर्डी, ता. पाचोरा) असं अपघातातील मयताचे नाव असून या प्रकरणी आयशर चालकाविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ( दि २८) सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास तांदुळवाडी फाट्याजवळ हा अपघात झाला. एमएच-५४-०१३१ क्रमांकाची आयशर गाडी चालवत असलेला अरबाज शाफिक मन्यार (रा. यशवंत नगर, भडगाव) याने समोर असलेल्या दुचाकीला (एमएच-१९-डीयू-४१९५) मागून जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत धनराज निकुंभ यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालक प्रशांत पंडित एरंडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील उपचारासाठी चाळीसगाव येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या घटनेप्रकरणी मयताचे काका पंडित शामजी निकुंभ (रा. घुसर्डी, ता. पाचोरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आयशर चालक अरबाज शाफिक मन्यार याच्याविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करीत असून, या घटनेमुळे भडगाव-पाचोरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या

scooter

scooter