आकाशवाणी चौकात मोबाईल हिसकावून पळण्याचा प्रयत्न; दोघांना पोलिसांनी अडवले
जळगाव : आकाशवाणी चौक येथे ट्रॅफिक पॉईंट ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी सतर्कता दाखवत मोबाईल हिसकावून मोटारसायकलवरून पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अडवून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोटारसायकलसह पीडिताचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला.
काल ASI 2710 दीपक बनसोडे व पोलीस कॉन्स्टेबल ब.नं. 702 भूषण मोरे हे आकाशवाणी चौक येथे सकाळी 9 ते 13 आणि सायंकाळी 17:30 ते 21:00 या वेळेत ट्रॅफिक पॉईंट ड्युटीवर होते.
दरम्यान, दत्त मंदिराच्या बाजूने पीडित व्यक्ती जात असताना दोन इसमांनी त्याला अडवून त्याचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर दोघेही MH 19 ET 8367 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते.
मात्र, ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी तत्काळ दोघांना अडवून मोटारसायकल ताब्यात घेतली. तसेच त्यांच्या ताब्यातील पीडिताचा मोबाईल परत त्याच्या स्वाधीन करण्यात आला.
घटनेची माहिती तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला वायरलेसद्वारे देण्यात आली. त्यानंतर दोन्ही आरोपी तसेच मोटारसायकल पुढील कायदेशीर कारवाईसाठी जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदारांच्या ताब्यात देण्यात आले.