जळगाव प्रतींनिधी
जळगाव जिल्ह्यातील दुष्काळस्थिती व व्यवस्थापन आढावा बैठक, महसूल मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत संपन्न; केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांची उपस्थिती...
जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज महसूल मंत्री चन्द्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव जिल्ह्या दुष्काळस्थिती व व्यवस्थापन आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
जळगाव जिल्ह्यात यंदा निर्माण झालेली पावसाची कमतरता, त्याचा शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम आणि संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत जिल्ह्याचा तालुकानिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्ह्यातील सध्याची दुष्काळस्थिती, पर्जन्यमानाची स्थिती, खरीप पिकांची परिस्थिती, पिकांचे झालेले नुकसान, उपलब्ध जलसाठा, भूजल पातळी, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता व संभाव्य पाणीटंचाई, पशुधनासाठी चारा व पाण्याची व्यवस्था तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनामार्फत करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती घेण्यात आली.
विशेषतः शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दुष्काळाच्या संकटाचा कमीत कमी फटका बसावा, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ आणि प्रभावीपणे राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
दुष्काळाच्या परिस्थितीत प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच तातडीच्या मदतीचे नियोजन करावे, नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि शेतकऱ्यांच्या अडचणी प्राधान्याने सोडवाव्यात, याबाबत बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर, पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शासन पूर्णपणे संवेदनशील असून, दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यासाठी शासन व प्रशासन कटिबद्ध आहे.
यावेळी खासदार श्रीमती स्मिता वाघ, माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील, आमदार. नंदकिशोर महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर आप्पा पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिश्मा नायर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.