मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची तरसोद येथे भेट; आरोग्य सुविधा व शैक्षणिक गुणवत्तेचा घेतला आढावा
आरोग्य सेवांमध्ये कोणतीही तडजोड नको; निपुण अभियानांतर्गत गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्न करा – मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर
जळगाव, : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी जळगाव तालुक्यातील तरसोद येथे भेट देऊन ग्रामपंचायत कार्यालय, आरोग्य उपकेंद्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच अंगणवाडीची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी विविध शासकीय सुविधांचा आढावा घेत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
ग्रामपंचायत कार्यालयाच्या भेटीदरम्यान त्यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजाची व नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेतली. गावाच्या विकासासाठी विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
आरोग्य उपकेंद्राच्या पाहणीवेळी नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला. आरोग्य सेवा पुरविताना कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये. आरोग्य केंद्रातील आवश्यक सुविधा, औषधांचा साठा, स्वच्छता तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवांकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या.
त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन त्यांनी शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विकसित करण्यासाठी शिक्षकांनी नियोजनबद्ध पद्धतीने अध्यापन करावे. विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती नियमितपणे तपासून ज्या विद्यार्थ्यांना अधिक मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
अंगणवाडीच्या पाहणीदरम्यान बालकांना मिळणाऱ्या सुविधा, पोषण आहार आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या कामकाजाची माहिती घेऊन बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार शासकीय सेवा मिळाव्यात, आरोग्य सुविधांचा स्तर उंचावावा आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी, या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी या भेटीदरम्यान विविध विभागांच्या कामकाजाची पाहणी करून संबंधितांना मार्गदर्शन केले