मुंबई | ५ नोव्हेंबर २०२६
अभाविपच्या शिष्टमंडळासोबतच्या विद्यावेतनवाढ मागणीला महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद; इंटर्न डॉक्टरांच्या विद्यावेतनवाढीबाबत शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा
मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून विद्यावेतनवाढीबाबत लवकरच निर्णय घेण्याची ग्वाही; विद्यावेतन न देणाऱ्या सर्व विद्याशाखांतील महाविद्यालयांवर कारवाईचा मुद्दा उपस्थित
महाराष्ट्रातील वैद्यकीय इंटर्न विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनवाढीसह विविध प्रलंबित प्रश्नांबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महाराष्ट्र प्रदेशाच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री मा. हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी इंटर्न डॉक्टरांचे सध्याचे ₹१८,००० विद्यावेतन वाढवून ३०,००० करण्यात यावे, अशी प्रमुख मागणी अभाविपच्या वतीने करण्यात आली. तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांकडून इंटर्न विद्यार्थ्यांना विद्यावेतन न देणे किंवा नियमानुसार पूर्ण विद्यावेतन न देणे, या प्रकारांबाबतही शिष्टमंडळाने मंत्र्यांचे लक्ष वेधले.
या बैठकीत वैद्यकीय शिक्षणमंत्री मा. हसन मुश्रीफ यांनी इंटर्न डॉक्टरांचे विद्यावेतनवाढीच्या मागणीबाबत सकारात्मक भूमिका दर्शवली. यासंदर्भात मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच विद्यार्थ्यांना नियमानुसार विद्यावेतन न देणाऱ्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची तपासणी करून संबंधित महाविद्यालयांवर आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वैद्यकीय शिक्षणाच्या अंतिम टप्प्यातील इंटर्न विद्यार्थी रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष रुग्णसेवेची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडत असतात. अनेक रुग्णालयांमध्ये अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्यांच्यावर कामाचा मोठा भार असतो. असे असतानाही त्यांच्या कामाचे स्वरूप आणि जबाबदारीच्या तुलनेत मिळणारे विद्यावेतन अपुरे आहे. विशेषतः खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यावेतन न देणे किंवा त्यामध्ये अनियमितता ठेवणे, यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.