Monday, 12 October 2026 03:20:56 AM
राजकारण

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवरील ड्रोन रेकीप्रकरणी चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवरील ड्रोन रेकीप्रकरणी चौकशीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन

एकनाथ खडसेंच्या फार्महाऊसवरील ड्रोन रेकीप्रकरणी चौकशीची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन; खडसे कुटुंबीयांना अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी
जळगाव : मुक्ताईनगर येथील माजी मंत्री तथा विद्यमान विधानपरिषद आमदार एकनाथराव खडसे यांच्या फार्महाऊस परिसरात ड्रोनद्वारे रेकी करण्यात आल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच खडसे कुटुंबीयांना अतिरिक्त सुरक्षा पुरवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी  जळगावचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, २८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री मुक्ताईनगर येथील एकनाथ खडसे यांच्या फार्महाऊस परिसरात ड्रोनद्वारे निगराणी करण्यात आली. फार्महाऊसवरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ड्रोनच्या हालचालींचे व्हिडिओ चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये केले आहे. या घटनेबाबत आमदार एकनाथ खडसे यांनी पोलीस महासंचालकांकडे तक्रार केली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मात्र, या प्रकरणी अद्याप जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार प्राप्त झालेली नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
दोषींना अटक करण्याची मागणी
ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या निगराणीची तातडीने सखोल चौकशी करून यामागील व्यक्तींचा शोध घ्यावा आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच खडसे कुटुंबीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
दरम्यान, या प्रकरणी तातडीने कारवाई न झाल्यास आगामी काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोदबापू पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, कार्याध्यक्ष राजुभाऊ मोरे, डॉ. संग्रामसिंग सूर्यवंशी, जिल्हा कार्यालय सरचिटणीस वाय. एस. महाजन, महानगर जिल्हा सरचिटणीस सुनील माळी, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहरभाई पठाण, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश बारे, युवक महानगर जिल्हाध्यक्ष विनायक पाटील, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गौरव वाणी, महानगर अध्यक्ष गिरीश सांगळे, जिल्हा उपाध्यक्ष किरणभाऊ राजपूत, गणेशभाऊ पाटील, नईम खाटीक आणि रफीक पटेल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या