Friday, 27 November 2026 09:20:11 PM
आरोग्य

महापौरांची वार्ड क्र. १ मध्ये धडक कारवाई ; आरोग्य निरीक्षकांच्या हलगर्जी  कारभारावर संताप दीपावलीच्या पार्श्वभूमीवर 'महापौर स्वच्छता संकल्प अभियाना'अंतर्गत प्रत्यक्ष पाहणी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश

महापौरांची वार्ड क्र. १ मध्ये धडक कारवाई ; आरोग्य निरीक्षकांच्या हलगर्जी  कारभारावर संताप,दीपावलीच्या पार्श्वभूमीवर 'महापौर स्वच्छता संकल्प अभियाना'अंतर्गत प्रत्यक्ष पाहणी,उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश

जळगाव : शहरात दीपावलीच्या पार्श्वभूमीवर गुरुवार दि. १५ पासून सुरू झालेल्या  'महापौर स्वच्छता संकल्प अभियाना'दरम्यान वार्ड क्रमांक १ मधील आरोग्य निरीक्षकांच्या नियोजनशून्य कारभारावर महापौर दीपमाला काळे यांनी तीव्र संताप व्यक्त करत अधिकाऱ्यांना तातडीने सुधारणा करण्याचे कडक आदेश दिले.

बीव्हीजी संप व कचऱ्याची स्थिती: बीव्हीजी कंपनीच्या संपामुळे गेल्या दोन दिवसांपासून घंटागाडी बंद असल्याने परिसरात उघड्यावर कचरा साचल्याचे समोर आले. येथे आरोग्यासाठी ३२ कर्मचारी असून कचरा उचलण्यासाठी सध्या फक्त १ ट्रॅक्टर सुरू आहे. त्यामुळे उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर तातडीने दंड आकारण्याचे आदेश महापौरांनी दिले असून या भागात आणखी दोन ट्रॅक्टरची व्यवस्था करण्याचे नियोजन अधिकाऱ्यांना दिले.

कर्मचाऱ्यांची हजेरी व कारवाई: वार्ड क्रमांक १ मध्ये २७ गल्ल्या असून तेथील कामाचा आढावा स्वच्छता निरीक्षकांकडून घेण्यात आला. स्वच्छता निरीक्षकांनी मुकादमकडून काम करून घेताना व्यवस्थित नियोजन करून काम करून घ्या. अतिशय बिकट परिस्थितीत देखील स्वच्छतेचे काम पूर्ण करता येते असे महापौरांनी सांगितले. काही कर्मचारी फक्त हजेरी लावून काम करत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारीवरून महापौरांनी अशा कर्मचाऱ्यांना तात्काळ नोटीस बजावण्याच्या सूचना दिल्या.
ड्रेनेज व पाण्याची समस्या: नागरिकांनी ड्रेनेज, गटारी आणि पाण्याच्या समस्येबाबत गाऱ्हाणी मांडली. पुढील २० दिवसांत नागरिकांनी स्वतः ड्रेनेज सिस्टीम जोडून न घेतल्यास दंड आकारला जाईल, असे स्पष्ट करत उपायुक्त निर्मला गायकवाड यांना याविषयी सूचित करण्यात आले.
काळे नगर परिसरातील समस्या: काळे नगर भागात १४ कर्मचारी साफसफाईसाठी कार्यरत असले तरी मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. या ठिकाणी कामासाठी जेसीबी देण्यात आला आहे. तसेच ठिकठिकाणी डबक्यासारखे पाणी साचत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी महापौरांना दाखवल्या.
गेंदालाल मिल व लक्ष्मीनगर परिसर: गेंदालाल मिल परिसरात कचरा मोठ्या प्रमाणावर साचून राहिल्याचे नागरिकांनी फोटोंद्वारे दाखवून दिले. त्यावर तात्काळ कचरा उचलण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. याशिवाय, लक्ष्मीनगर भागातील कानळदा रस्त्यावर उघड्यावर कचरा व मुख्य रस्त्यावरील पत्र्याचे मोठ्या शेडचे अतिक्रमण पाहून महापौरांनी ते तातडीने निष्कासित करण्याचे आदेश दिले.

या पाहणी दौऱ्यादरम्यान वार्ड क्रमांक १ च्या नगरसेविका रिटा सपकाळे, संगीता दांडेकर, उपायुक्त निर्मला गायकवाड, शहर अभियंता आर. टी. पाटील, आरोग्य विभाग प्रमुख समीर बोरोले, अभियंता जितेंद्र रंधे, विद्युत विभागाचे सुमित पाटील आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

संबंधित बातम्या