“कर्ज फेडल्याशिवाय मरायचं नाही!” — उतारवयातही कर्ज फेडण्याची जिद्द,मांडवा गावातील कर्जबाजारी आजीच्या वेदनेने डॉ. प्रभाकर साळवेही गहिवरले; शेतकऱ्यांच्या वेदना पाहून मन हेलावलं!
जामनेर प्रतींनिधी -
राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रभाकर साळवे यांचा ‘राजा उदार झाला, हाती भोपळा दिला!’ हा घोड्यावरून दुष्काळ पाहणी दौरा सुरू असताना मांडवा गावात एका कर्जबाजारी आजीबाईंची भेट झाली. आयुष्याच्या उत्तरार्धात सुखाचे दोन घास खाण्याऐवजी कर्जाचा डोंगर डोक्यावर घेऊन जगणाऱ्या या आजीने आपल्या व्यथा मांडल्या आणि त्यांच्या तोंडून बाहेर पडलेले शब्द उपस्थितांच्या काळजाला भिडले…“मला कर्ज घेऊन मरायचं नाही… मला हे कर्ज फेडायचं आहे!”हे केवळ एका आजीचे शब्द नव्हते, तर कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या असंख्य शेतकरी कुटुंबांच्या मनातील आक्रोश होता! आयुष्यभर कष्ट करूनही पदरी निराशा आलेल्या या आजीबाईंना आज स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोलमजुरी करावी लागत आहे. दिवस उजाडला की कामाच्या शोधात बाहेर पडायचे, दिवसभर घाम गाळायचा आणि संध्याकाळी मिळालेल्या पैशांतून पोटाची खळगी भरायची… पण एवढं करूनही उद्याचा दिवस कसा निघणार, कर्ज कसं फेडणार आणि आयुष्याचा गाडा पुढे कसा चालवणार, ही चिंता त्यांना सतावत आहे.
उतार वयाच्या या टप्प्यावर माणसाला आधाराची गरज असते. दोन प्रेमाचे शब्द, दोन घास सुखाचे आणि कुटुंबासोबत शांततेत जगण्याची इच्छा असते. मात्र, या आजीबाईंच्या वाट्याला आले आहे ते कर्जाचे ओझे, मजुरीची धावपळ आणि भविष्याची काळजी! त्यांना कर्जातून सुटका हवी आहे; आयुष्य संपवायचं नाही. त्यांना भीक नको, तर कष्टाने घेतलेले कर्ज फेडून सन्मानाने जगण्याची संधी हवी आहे! अशी व्यथा आणि आजीचे अश्रू पाहून डॉ. साळवेही अस्वस्थ झाले .
दौऱ्यादरम्यान प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणाऱ्या डॉ. प्रभाकर साळवे यांच्यासमोर जेव्हा या आजीबाईंनी आपल्या दुःखाचा पाढा वाचला, तेव्हा त्यांचेही मन हेलावून गेले. एका वृद्ध महिलेच्या डोळ्यांतील अश्रू, तिच्या आवाजातील हतबलता आणि कर्ज फेडण्याची तळमळ पाहून साळवे अस्वस्थ झाले.शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरलेल्या या नेतृत्वाला प्रत्यक्ष परिस्थितीची भीषणता पुन्हा एकदा जाणवली. कागदावर मदतीच्या घोषणा करणे वेगळे आणि गावागावांत जाऊन गरिबांच्या डोळ्यांतील अश्रू पाहणे वेगळे! एका आजीचे दुःख हे केवळ तिचे वैयक्तिक दुःख नाही; ती ग्रामीण व्यवस्थेतील आर्थिक संकटाची जिवंत कहाणी आहे.साळवेंनी प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला
या आजीबाईंची परिस्थिती पाहून डॉ. प्रभाकर साळवे यांनी स्वतःहून त्यांना मदत करण्याची तयारी दर्शवली. मात्र, त्यांचा हा दौरा केवळ वैयक्तिक मदतीपुरता मर्यादित नाही. शेतकऱ्यांच्या व्यथा, कर्जबाजारी कुटुंबांच्या समस्या आणि प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती शासनापर्यंत पोहोचवणे, हेच या आंदोलनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी किती घोषणा झाल्या, किती आश्वासने दिली गेली, यापेक्षा प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात काय पडले, हा खरा प्रश्न आहे. शेतीतून उत्पन्न मिळत नसेल, कर्जाचा बोजा वाढत असेल आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मोलमजुरी करावी लागत असेल, तर त्यांच्या समस्यांचे गांभीर्य समजून घेणे ही शासनाची जबाबदारी आहे.
डॉ. प्रभाकर साळवे यांचा घोड्यावरून दुष्काळ पाहणी दौरा याच वास्तवाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे. गावागावांत जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकणे, त्यांच्या वेदनांना वाचा फोडणे आणि त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवणे, हा या दौऱ्याचा केंद्रबिंदू आहे असे साळवे यांनी सांगितले.त्यांनी घोड्यावरून जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि शेतकर्यांना प्रती एकर 25 ते 50 हजार रुपये मदत मिळावी ही मागणी केली '
डॉ. प्रभाकर साळवे यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्याचा आणि त्यांचे प्रश्न शासनासमोर मांडण्याचा घेतलेला पुढाकार सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे .