जळगाव जिल्ह्यात चारा साक्षरता व संवर्धन अभियानाचा पहूर येथून शुभारंभ
उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन व कार्यक्षम वापर गरजेचा : डॉ. प्रदीप झोड
जळगाव, अल निनोमुळे होणाऱ्या वातावरतीय बदलांच्या पार्श्वभूमीवर संभाव्य चारा टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभाग, जळगाव यांच्या वतीने पशुपालकांमध्ये चारा साक्षरता व संवर्धनाबाबत जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ नुकताच पशुवैद्यकीय चिकित्सालय, पहूर, ता. जामनेर येथून करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. प्रदीप झोड उपस्थित होते. त्यांनी पशुपालकांना मार्गदर्शन करताना उपलब्ध चाऱ्याचे जतन, संवर्धन, पोषणमूल्यवर्धन आणि कार्यक्षम वापर करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले.
चारा टंचाई निर्माण होण्यापूर्वी प्रतिबंधात्मक व पूर्वतयारीच्या उपाययोजना करणे आवश्यक असून, पिकांचे अवशेष जतन करणे, सुरक्षित पद्धतीने चारा साठवणूक करणे, मूरघास निर्मिती, अझोला उत्पादन, हायड्रोफोनिक चारा तसेच स्थानिक पातळीवर चारा उत्पादन वाढविणे याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
डॉ. स्वप्नजा लोखंडे यांनी चारा युरिया प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. तर डॉ. रामदास जाधव यांनी कडबा कुट्टी व चारा बियाण्याबाबत पशुपालकांना माहिती दिली.
५१ पशुपालकांना चारा बियाण्यांचे वाटप
अभियानाच्या शुभारंभानिमित्त परिसरातील मागणी नोंदविलेल्या ५१ पशुपालकांना चारा उत्पादनासाठी बियाण्यांचे वाटप करण्यात आले. पशुपालकांनी भविष्यातील चाऱ्याची गरज लक्षात घेऊन चारा पिकांची लागवड व योग्य नियोजन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पहूर पशुवैद्यकीय दवाखान्याचे प्रमुख डॉ. श्रीकांत व्यवहारे यांनी केले. चारा टंचाईच्या काळात उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने आणि योग्य पद्धतीने वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जामनेर तालुक्याचे गट विकास अधिकारी श्री. श्रीकृष्ण इंगळे यांनी मार्गदर्शन करताना दुष्काळी परिस्थितीत जनावरांना वर्षभर पुरेसा व सकस चारा उपलब्ध होण्यासाठी पशुपालकांमध्ये चारा नियोजनाबाबत सातत्याने जागरूकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जळगाव डॉ. शामकांत हिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. बाबुराव घोंगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य व माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री. प्रदीपभाऊ लोढा, श्री. शंकर जाधव, उपसरपंच पहूर कसबे श्री. राजू जाधव, ॲड. संजय पाटील, श्री. रमेश नागपुरे, श्री. शिवदास गव्हाळे तसेच पहूर कसबे व पहूर पेठ येथील ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संदीप पाटील, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, नाचणखेडा यांनी केले. अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. एकनाथ बारी, सुनील बारी, मिलिंद बारी, दादाराव पाटील, श्री. अशोक जाधव, संजय पाटील व नरेंद्र गोसावी यांनी सहकार्य केले. श्री. योगेश पाटील यांनी आभार मानले.
नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात मागणी नोंदविण्याचे आवाहन
जळगाव जिल्ह्यातील पशुपालकांनी वैरण विकास योजनेंतर्गत चारा पिकांच्या लागवडीसाठी बियाणे मिळविण्याकरिता नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आपली मागणी नोंदवावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभाग, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.